नाईक मराठा मंडळ, मुंबई. ही संस्था "देवळी" या ज्ञातीची असून महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग (OBC) यादीमध्ये अंतर्भूत आहे. ह्या संस्थेची महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात नोंदणी क्र. ए-१३२१ (बी) या क्रमांकावर नोंदणी झालेली आहे.

 

१६ ऑक्टोबर ई.स. १९२६, या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला ८३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या चालू आहे. आज संस्था आपल्या समाज बांधव भगिनिसाठी अनेक उपक्रम राबवित आहे.

 

"ना.म.मं." च्या कार्यकारी मंडळाच्या अथक प्रयत्नाने आणि संस्थेचे आजचे अध्यक्ष श्री. किशोर गोविंद सातोसकर यांच्या मार्गदर्शनातून संस्था अनेक कार्यक्रम राबवित आहे. समाजातील कोणताही विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि त्यापुढील शिक्षणासाठी माफक दराने कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. याचा लाभ आज अनेक विद्यार्थी घेत आहेत. विविध परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात येते. समाजातील निराधार तसेच वृद्ध महिला आणि पुरुषांना निर्वाह निराधार योजनेखाली दरवर्षी अर्थसहाय्य दिले जाते ज्यामुळे शेकडो महिलांना थोडया प्रमाणात का होईना पण एक आधार मिळालेला आहे. समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना व्यैद्यकीय मदत दिली जाते. समाजातील वधु-वरांसाठी विनामूल्य स्वरुपात "वधु वर सूचक केंद्र" चालविले जात आहे. विवाह जुळण्यासाठी तसेच थेट प्रत्यक्ष विचारांची देवाणघेवाण घडविण्याकरिता वधु-वर मेळावे आयोजित करण्यात येतात. आज "ना.म.मं." चे कार्यकारी मंडळ दरवर्षी कोकणासारख्या ग्रामीण भागातील आपल्या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक, कर्जाऊ शिष्यवृत्तीचे वाटप, निर्वाह निराधार मदत प्रत्यक्षात कोकणात जाऊन देते. आज त्या विद्यार्थी आणि पालकांचे संस्थेशी एक वेगळे नाते निर्माण झाले आहे.

 

समाजातील या सर्व घडामोडी सर्व समाज बंधू भगिनिपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे "स्नेहबंध" हे त्रैमासिक मुखपत्रक चालविले जात आहे. हे सर्व उपक्रम समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या विविध कायमस्वरूपी ठेव देणग्या, दीपावली भेट तसेच इतर मार्गी  नैमित्तिक देणग्याद्वारे चालविले जाते. या सर्व व्यतिरिक्त आमच्या संकेतस्थळाद्वारे कोकणातील सर्व घडामोडींची माहिती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने कोकण बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा नवीन प्रयत्न आहे.

 

अलीकडेच संस्थेला ८०-जी  हे प्रमाणपत्र आयकर खात्याकडून मिळालेले आहे आणि त्यामुळे संस्थेला दिलेल्या सर्व देणग्या या आयकरातून सूट मिळण्यासाठी पात्र आहेत. या आधारे आम्ही समाजातील तमाम दानशूर व्यक्तींना तसेच इच्छुक व्यक्तींना समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सहाय्य करण्याकरिता आव्हान करीत आहोत की ज्याद्वारे संस्थेची ८३ वर्षांची वाटचाल यशस्वीरीत्या पुढे चालू राहावी.